काँग्रेसनं नवजोतसिंग सिद्धूवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून सत्ताधाऱ्यांनी न केलेल्या कामांचा लेखाजोगा मतदारांसमोर वाचून दाखवला जात आहे. मागील निवडणूकीत काँग्रेसचा सुफडासाफ झाला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने माजी क्रिकेट पट्टू आणि आमदार नवजोतसिंग सिद्धू यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. काँग्रेसने नुकत्याच आपल्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू बाजूला पडले होते. काँग्रेसमधील धडाडती तोफ म्हणून सिद्धी यांची ओळख असून त्यांच्या खांद्यावर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचेही नाव आहे.

सिद्धूच्या जोडीला शत्रुघ्न आणि सिंधिया
काँग्रेसने जाहीर केलेल्या प्रचारकांच्या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबरोबरच डॉ. मनमोहन सिंह असणार आहे. तर नवजोतसिंह सिद्धू यांच्यासोबत भाजमधून काँग्रेसमध्ये आलेले नेते देखील काँग्रेसचे स्टार प्रचारक बनले आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा, उदित राज आणि कीर्ती आझाद यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट आहेत. तसेच माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह शर्मिष्ठा मुखर्जी आणि रागिनी नायक यासरखे चेहरेदेखील काँग्रेसचे स्टार प्रचारक असून ते दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसची बाजू मतदारांसमोर मांडणार आहेत.

काँग्रेसने ज्येष्ठ नेत्यांना उतरवले प्रचारात
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लोकप्रिय चेहऱ्यांसोबतच ज्येष्ठ नेत्यांना देखील प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कपिल सिब्बल यांच्यासह हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत याचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समावेश असून हे ज्येष्ठ नेते पक्षासाठी मते मागणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –