‘PM मोदी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचे प्रदर्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोपा दाखल केलेल्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणांसाठी भावुक झाले होते. त्यावरुन आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत रडणं म्हणजे उत्तम अभिनयाचे प्रदर्शन,” असल्याचं थरूर यांनी म्हटलं.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी लिहलेल्या ‘बाय मेनी अ हॅपी अ‍ॅक्सिडन्ट : रिकलेक्शन ऑफ ए लाईफ’ या पुस्तकावर आयोजित परिचर्चेत काँग्रेस नेते शशी थरूर सहभागी झाले होते. तेव्हा बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधानांनी राज्यसभेत रडणे म्हणजे उत्तम अभिनयाचे प्रदर्शन आहे. तसेच हे कदाचित राकेश टिकैत (शेतकरी नेते) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आलं असावे…पंतप्रधानांना वाटलं असावं की आपल्याकडेही अश्रू आहेत,” असे म्हणत थरूर यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र डागले.

संजय राऊतांचा टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि करताहेत, ते नौटंकी आहेत, असे म्हणताहेत. हा फार विचित्र प्रकार आहे,” असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.