पक्ष सोडणाऱ्यांसाठी काँग्रेस साखर वाटून ‘आनंदोत्सव’ साजरा करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी नामशेष होईल अशी दवंडी भाजपकडून दिली जात असताना शहर काँग्रेस कडून ‘फुटीरांच्या’ पक्ष सोडण्याच्या निर्णयाचा साखर वाटून आनंद साजरा करण्यात येणार आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात भाजपचाच बोलबाला सुरू झाला आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विरोधकांना चारिमुंडया चीत करत पुन्हा बहुमताने सत्ता खेचून आणली. सत्ता मिळवताना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा पुरेपूर वापर करण्यात आला. प्रामुख्याने भेद निती मुळे प्रमुख विरोधी पक्षातील, राज्याचा विचार करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेकांना भाजप मध्ये प्रवेश देण्यात आला. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पुन्हा भेदनीतीचा वापर करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेस्तनाबूत करण्याचा एककल्ली कार्यक्रम सध्या भाजप राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. थोडक्यात यंदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकच उरणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे.

पक्षाला लागलेल्या गळतीमुळे दोन्ही काँग्रेस चे उर्वरित नेते धास्तावलेले दिसत असले तरी तळातील कार्यकर्ते तितकेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने घराणेशाही मुळे संधी नाकारली गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नेते पक्ष सोडत असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. किमान नेहमीच तडजोडीच्या राजकारणासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वापर करणाऱ्या अशा नेत्यांच्या निषेध आणि नव्या आणि निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हे कार्यकर्ते सरसावले आहेत.

येत्या 6 तारखेला सारसबागे जवळील वसंतदादा पाटिल यांच्या पुतळ्याजवळ नागरिकांना साखर वाटून हा आनंदोतसव साजरा करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर भावे हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत, असे प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी कळविले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –