औरंगाबादच्या नामांतरास विरोध होता, यापुढेही राहील : अशोक चव्हाण

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही, असे नमूद करत औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील, असे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Former Chief Minister and Public Works Minister Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही. नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ठामपणे विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर शनिवारी (दि. 2) चव्हाण यांनीही औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील, असे सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शहराच्या नामांतरावरून वादळ उठलं आहे.औरंगाबादच संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असताना काँग्रेसने मात्र या नामांतरास ठाम विरोध केला आहे. यावरून शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांवर टोलेबाजी केली होती. शिवसेना केवळ निवडणुकीपुरता या मुद्द्याचा वापर करत आली आहे. आताही तेच सुरू आहे. आम्ही मागणी करतो आणि तुम्ही विरोध करा, अशा पद्धतीने राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची नुरा कुस्ती चालली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.