विधानसभा अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची होऊ शकते निवड ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या विधानसभा अध्यपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच काही नावांची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विधानसभा अध्यपद काँग्रेसकडेच राहणार की राष्ट्रवादीकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, विधानसभा अध्यपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यपदासाठी काँग्रेसमधून अनेक नावं चर्चेत आली आहेत. संग्राम थोपटे, सुरेश वारपूडकर, अमीन पटेल यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांचे देखील नाव अध्यपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

केसी पाडवींचे नाव आघाडीवर

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना समसमान वाटप कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कोणतेही बदल यामध्ये होणार नाहीत. केसी पाडवी हे आदिवासी विकास मंत्री असून विधानसभा अध्यपदी त्यांची निवड होऊ शकते. पाडवी हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते अक्कलकुवा मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी अनेक मंत्रीपदं भूषवली आहेत.

भोरचे आमदार संग्राम थोपटे शर्यतीत

नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये भोर विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांचे नाव समोर आले आहे. थोपटे हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मंत्री म्हणून देखील काम केले. संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्य़ालयाची तोडफोड केली हेती. थोपटे यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसला वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची ही बाजू जमेची आहे.

आमदार सुरेश वारपूडकर चर्चेत

पाथरी मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार सुरेश वारपूडकर यांचे नाव समोर येत आहे. 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. परभणीतून 1998-99 मध्ये खासदार होते. अत्यंत मितभाषी आणि सर्वांशी चांगले राजकीय संबंध ही वारपूडकर यांची जमेची बाजू आहे.

आमदार अमीन पटेल नाव चर्चेत

अमीन पटेल हे मुंबईतील आमदार असून त्यांची तिसरी टर्म आहे. मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुस्लिम चेहरा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचा असला तरी शिवसेना मात्र त्यास तयार होईल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.