तहसीलदार ‘मॅडम’ हिरोईनसारख्या दिसतात : भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर

जालना : पोलिसनामा ऑनलाइन – व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात, असे वादग्रस्त आणि लज्जास्पद वक्तव्य राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे. परतूर तालुक्यातील एका गावातील वीज केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आलेले बबनराव लोणीकर हे बोलत असताना त्यांची जीभ घसरली. भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध सर्वत्र होत आहे.

परतूर तालुक्यातील एका गावात वीज उपकेंद्राचे उद्घाटन बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना लोणीकर म्हणाले, शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढावा. त्याशिवाय सरकार त्यांना 25 हजार रुपये अनुदान देणार नाही. या मोर्चासाठी मी कुणाला आणू ते तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर व्यासपीठावर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असे लज्जास्पद आणि वादग्रस्त वक्तव्य लोणीकर यांनी केले. लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महिला तहसिलदार स्टेजवरून उठून गेल्या. मी जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे म्हणत लोणीकर यांनी असभ्यपणाचा कळस गाठला. संतापजनक म्हणजे त्यांना त्यांच्या वक्तव्यात काहीच वादग्रस्त असल्याचे वाटले नाही.

Advt.

विशेष म्हणजे बबनराव लोणीकर यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा व्यासपीठावर त्यांचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर आणि सरपंच देखील होते. एका अधिकारी महिलेबाबत लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, लोणीकर यांच्या वक्तव्याची तहसिलदार संघटनेने दखल घेतली असून त्यांचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या की, गर्दी जमवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणार्‍या लोणीकर यांनी जाहीर माफी मागावी. तहसिलदार महिलेने पुढे येऊन लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा.