मतदारांनी एकाच पक्षाचे सरकार निवडावे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘राज्यातील मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार निवडावे,’ असे वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. भाजपचे वरिष्ठ मंत्री असलेल्या तावडे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे युतीतील मित्रपक्षांमध्ये आलबेल नाही असेही बोलेल जात आहे. शनिवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तावडे यांना बोलावले होते. त्यावेळी बोलताना तावडे यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना तावडे म्हणाले की, “केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास निर्णय घेताना अडचणी येत नाहीत. त्यामुळे राज्यातील मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार निवडावे.”

‘मतदारांनी एकाच पक्षाचे सरकार निवडावे’

पुढे बोलताना तावडे म्हणाले की, “पूर्वीच्या आघाडीच्या सरकारमधील तत्कालीन शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना निर्णय घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. याचा परिणाम शिक्षणाचे धोरण ठरविण्यावर होत झाला. सर्व क्षेत्राचे धोरण ठरविताना केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार असल्यास अडचणी येत नाहीत. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही एकाच पक्षाचे स्थिर सरकार निवडावे.”

‘विद्यार्थ्यांनी अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा’

याशिवाय, “खासगीकरणामुळे परदेशात शिक्षणाला जाणारे भारतात शिक्षण घेत आहेत, याचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेण्याची मानसिकता बदलावी आणि अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा” असे ते म्हणाले.

या पदवीदान सोहळ्यात एकूण तीन जणांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये कलाक्षेत्रासाठी उषा मंगेशकर, डिझाईनमझील संशोधनासाठी सुधाकर नाडकर्णी व तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल संजय काटकर यांचा समावेश आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण २३६ स्नातकांना विद्यापीठातर्फे पदवी प्रदान करण्यात आली. यात एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनचे ९९, एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमचे ६५ आणि एमआयटी मॅनेटच्या ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या समारंभात ११ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. अरिफ महमद खान, डॉ. जब्बार पटेल, प्रा. प्रकाश जोशी, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय आदी उपस्थित होते.