Coronavirus : पुण्यात आढळले कोरोनाचे 5 नवीन रूग्ण, विभागातील संख्या 77 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोना व्हायरस फोफावला आहे. राज्यामध्ये देखील कोरोनामुळं अनेकजण आजारी पडले आहेत. त्यातच पुण्यामध्ये आज (बुधवार) दुपारी 2 वाजेपर्यंत कोरोनाचे 5 नवीन रूग्ण आढळले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. आता पुणे विभागातील म्हणजेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील रूग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती आता 77 पर्यंत पोहचली आहे.

सद्यस्थितीला पुणे शहरात कोरोनाचे 36, पिंपरी-चिंचवडमध्ये 12, सातार्‍यात 2, कोल्हापूर 2, सांगलीत 25 रूग्ण कोरोनाबाधित आहेत. तपासणीसाठी आतापर्यंत 1633 रूग्णांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी तब्बल 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहेत. अहवालामध्ये तब्बल 1413 नमुने हे निगेटीव्ह आले असून 77 नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 16 रूग्ण बरे झाल्यानं त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे. पुणे शहरात 5 नवीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासन जनतेला पुन्हा-पुन्हा घरा बाहेर न पडण्याचं आवाहन करीत आहे.