भारतात ‘कोरोना’ची दुसरी लाट ‘पावसाळ्यात’ येऊ शकते, शास्त्रज्ञांचे मत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, लॉकडाऊन हटवल्यानंतर काही आठवड्यापर्यंत कोरोनाच्या संसर्गाच्याबाबतीत भारतामध्ये घट दिसून येईल, परंतु पावळाळ्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. परंतु हे भारतातील सोशल डिस्टन्सिंगवर अवलंबून असणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही तर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
नवीन प्रकरणांचा आलेख स्थिर शिव नादर विद्यापीठाच्या गणित विभागाचे सहयोगी प्राध्यापक समित भट्टाचार्य म्हणाले की, नव्या प्रकरणांचा आलेख सध्या एका पातळीवर स्थिर आहे. हा आलेख हळूहळू खाली येईल. यास काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात. असे असूनही अचानक संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात, ही संक्रमणाची दुसरी फेरी असेल.

जुलै-ऑगस्टमध्ये संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू शकतात
संसर्ग वाढण्याची दुसरी फेरी जुलैच्या शेवटी किंवा पावसाळ्यात ऑगस्टच्या सुरुवातीस येऊ शकते. त्यावेळी आपण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन किती करत आहोत यावर हे अवलंबून असेल.
चीनमध्ये निर्बंध हटल्यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली

बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) चे प्राध्यापक राजेश सुंदरसन हे देखील याबाबत सहमत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा आपण सामान्य स्थितीत परत येऊ, तेव्हा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. निर्बंध हटवल्यानंतर चीनमध्येही असेच काही घडले आहे. आयआयएससीच्या कोरोना आणि मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) वर संयुक्त शोध पत्रिका तयार  करण्यात प्राध्यापक सुंदरसन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्राध्यापक भट्टाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन करण्यापूर्वी बळी पडलेल्यांची संख्या 4.4 दिवसांत दुप्पट वाढत होती. लॉकडाऊननंतर आता ती संख्या 7.5 दिवसांत दुप्पट होत आहे. मागील काही दिवसांची प्रकरणे पाहिल्यास हे दिसून येते की हा दर सतत कमी होत आहे. त्यांनी सांगितले की, चीन आणि युरोपमधील परिस्थिती पाहिल्यास असे दिसून येते की, जे बरे झाले आहेत त्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच यापूर्वी या रोगाचा संसर्ग झालेल्यांमध्ये या विषाणूची प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. म्हणून संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील संपूर्ण लोकसंख्या धोक्यात येऊ शकते.

रुग्णांना क्वारंटाईन केल्याने रोगावर प्रतिबंध
आयआयएससी आणि टीआयएफआरने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या संयुक्त अभ्यासामध्ये असे सांगितले होते की, लॉकडाऊन, आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टन्सिंग यासारखे नियम काही काळ लागू राहू शकतात. दुसऱ्या फेरीच्या संसर्गाचा इशारा देताना बंगळुरु आणि मुंबईतील स्थितिवरील अभ्यासानुसार आक्रमकपणे या रोगाचा सामना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अहवालानुसार नवीन प्रकरणांतील रुग्णांना वेगवेगळे आयसोलेट केल्याने हा आजार बऱ्याच अंशी रोखला जाऊ शकतो.