Coronavirus : रशियामध्ये अमेरिका आणि स्पेननंतर सर्वाधिक कोरोनाबाधित, राष्ट्रपती पुतिन यांचे प्रवक्ता देखील पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रशियामध्ये कोविड -19 साथीच्या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू पॉझिटिव्हच्या संख्येत अमेरिकेनंतर रशिया दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. कोरोना विषाणूसंदर्भात मंगळवारी रशियात अजून दोन वाईट बातम्या समोर आल्या. पहिली बातमी म्हणजे सेंट पीटर्सबर्गच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने पाच कोरोना विषाणूच्या रुग्णांचा मृत्यू झाला जे व्हेंटिलेटरवर होते. आग एका अतिदक्षता विभागात लागली होती आणि अर्ध्या तासाच्या आत आगीला रोखण्यात यश मिळाले. यामागील कारण व्हेंटिलेटरमध्ये बिघाड असल्याचे सांगितले गेले. तर दुसरी बातमी म्हणजे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पेस्कोव्ह 2000 च्या सुरुवातीपासून पुतीन यांच्याबरोबर काम करत आहेत आणि ते 2008 पासून त्यांचे प्रवक्ता आहेत. दमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, ‘होय, मी आजारी आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत.’ सध्या पेस्कोव्ह यांची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट झालेले नाही कारण रशियामध्ये कोणतीही लक्षणे नसलेल्या लोकांनासुद्धा घरीच राहण्यास सांगितले गेले आहे. याआधी पंतप्रधान मिखाईल देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते.

या दोन्ही घटनांचा तपास सुरु आहे

कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की शनिवार व मंगळवारच्या घटनेत सामील असणाऱ्या व्हेंटीलेटरची चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की व्हेंटिलेटर एका रशियन निर्मात्याने तयार केले होते. मंगळवारपर्यंत रशियामध्ये 2,32,000 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर येथे एकाच दिवसात सर्वाधिक 11,600 रुग्ण आढळले आहेत.

रशियामध्ये विजय दिनाचे सेलिब्रेशन फिके

कोरोना साथीचा सामना करत असणाऱ्या रशियात विजय दिनाचे सेलिब्रेशन यावेळी फिके ठरले. दुसर्‍या महायुद्धात रशियाने नाझींवर विजय मिळवला होता, त्यामुळे दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात विजय दिन साजरा केला जातो मात्र या वेळेस तसे झाले नाही. रशियात विजय दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय सुट्टी होती आणि क्रेमलिन (रशियन संसद) च्या बाहेर सैनिकांच्या कब्रवर पुष्प अर्पण करण्यात आले. त्याच वेळी, राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी विजयाच्या या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त औपचारिक समारंभात युद्धादरम्यान सोव्हिएत सैन्याच्या धैर्य आणि बलिदानांच्या सन्मानार्थ एक लहान भाषण केले. पण संपूर्ण सोहळा हा फिका ठरला. इतकेच नव्हे तर लाल चौक (रेड स्क्वेअर) येथे भरविण्यात आलेल्या लोकांची भव्य परेड व मिरवणूक रद्द करण्यात आली. पुतीन म्हणाले, हा सोहळा साजरा करणे खूप धोकादायक ठरू शकते.