आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवून द्यावी, CM ठाकरेंची केंद्राकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकती पावले उचलली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रमुख चार शहरातील सर्व व्यापार, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अनेक कार्यालयात 25 टक्के कर्मचारी काम करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील चार शहरातील सर्व व्यापार, उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराने आयकर रिटर्न भरण्याची मुदत 31 मार्च आहे. आयकर रिटर्नची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे केली आहे. तसेच 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मदत देखील वाढवून द्यावी अशी विनंती केली आहे. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.