‘कोरोना’मुळे एसटी चालक-वाहकांच्या भरती प्रक्रियेला फटका !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे रोजगारापासून उद्योगांपर्यंत सर्वकाही ठप्प झाले आहे. कोरोनाचा फटका एसटीच्या सेवेत रुजू होणार्‍या सुमारे 3 हजार चालक आणि वाहकांनाही बसला आहे. त्यांचे प्रशिक्षण बंद करण्यात आले. यामध्ये 213 महिलांचाही समावेश आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याशिवाय एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. त्यामुळे एसटीच्या भरती प्रक्रियेवरही परिणाम झाला. एसटी महामंडळाने नवीन चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाले. कोरोनामुळे एसटी महामंडळाने प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, महिलांच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा आहे. यातील पाच महिने वाया गेले पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. 21 आदिवासी महिला डिसेंबर 2020 पर्यंत, तर त्यानंतर त्वरित उर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या, परंतु त्यांना एप्रिलनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे. कोरोनामुळे चालक कम वाहकांचे प्रशिक्षण थांबविले आहे. यामध्ये साधारण तीन हजार जण आहेत. प्रशिक्षण थांबविल्याने ते सेवेत काहीसे उशिरा येणार असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.