Coronavirus Lockdown : जमातींच्या शोधासाठी संपुर्ण देशात ‘सर्च ऑपरेशन’, अहमदाबाद पोलिसांवर दगडफेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. यातच दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिग ए जमातचा धार्मिक कार्यक्रम कोरोनाच्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. या कार्यक्रमात 2 हजार लोक सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता हे ठिकाण पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. मरकज येथून 2 हजारहून अधिक लोक निघून गेले आहेत यापैकी 617 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जमातमधून परत आलेल्या लोकांच्या शोधात दिल्ली ते मुंबई अशी मोहीम राबवली जात आहे.

जे लोक निरोगी आहेत आणि ज्यांचा तबलीगी जमातशी संबंध आहे अशा परदेशी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. संपूर्ण देशात जमातशी संबंधित दोन हजार परदेशी आहेत. आंध्र प्रदेशात मरकज जमातीशी संबंधित असलेल्या 30 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी 14 जणांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मरकज येथे गेलेल्या 13 बांगलादेशींना ठाणे येथे ताब्यात घेण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात 117 लोक क्वारंटाईन
मरकज येथून परत आलेल्या लोकांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम राबवण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान मऊ येथे 15 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण जमातमध्ये सहभागी झाले आणि मऊ येथे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 117 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात 65 जण क्वारंटाईन
उत्तर प्रदेशाप्रमाणे मध्य प्रदेशातील 108 जण मरकज येथे गेले होते. यामध्ये एकट्या भोपाळमधून 36 जणांचा ग्रुप या ठिकाणी गेला होता. या सर्वांना दिल्लीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. याव्यतिरीक्त 5 ते 14 मार्च दरम्यान धर्माच्या प्रचारासाठी भोपाळ येथे आलेल्या 63 परदेशी नागरिकांसह वेगवेगळ्या राज्यातील 189 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये 65 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यासोबत मरकज येथून आलेल्या इतरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

बिहारमध्ये शोधकार्य सुरु
बिहारमधील मरकजमध्ये 162 लोक सहभागी झाले होते. यामध्ये 17 जण पटणा आणि 13 लोक बक्सर येथील आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त परदेशातून आलेल्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली आहेत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मरकज येथून आलेल्यांचा शोध घेण्यासाठी बिहार सरकारने मोठे सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे.

मरकज मधून परतलेल्यांचा राजस्थानमध्ये शोध सुरु
मरकज येथे राजस्थान येथूनही काही लोक गेले होते. मरकज येथे गेलेल्यांचा राजस्थान सरकारने शोध सुरु केला आहे. बाडमेरमध्ये 12, सीकरमध्ये 9, करौलीमध्ये 10 आणि जैसलमेरमध्ये एक तर अजमेरमध्ये दोन जण मरकज येथून परत आले आहेत. सर्वांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

हरियाणामध्ये 40 जण क्वारंटाईनमध्ये
हरियाणामध्ये मरकज येथून आलेल्या 40 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी चौघांना अंबाला येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरीत लोकांचा शोध घेण्यासाठी हरियाणाच्या प्रशासनाने युद्धपातळीवर शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावे अशी सूचना देण्यात आली आहे.

अनेक राज्यात शोध मोहिम सुरु
मरकज येथून परतलेल्या लोकांचा इतर राज्यात देखील शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिम राबवली जात आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जमातमधून परतणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तामिळनाडूमध्ये आणखी 500 लोक आढळून आले असून त्यापैकी 50 जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.