आवाजावरून ‘कोरोना’ची टेस्ट, गोरेगावच्या नेस्को कोविड उपचार केंद्रात संशोधन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आवाजावरून कोरोनाची चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी गोरेगावच्या नेस्को करोना उपचार केंद्रात आजपासून संशोधनाला सुरुवात होणार आहे. इस्रायलमधील एका कंपनीच्या सहकार्याने पालिका 2000 कोरोना रुग्णांच्या आवाजाचा अभ्यास करणार आहे. यात यश आल्यास 30 सेकंदांत आवाजावरून चाचणी करणे शक्य होणार आहे .

इस्रायलमधील वोकालिस्ट हेल्थकेअर कंपनीच्या सहकार्याने मुंबईत प्रथमच या प्रकारचे संशोधन होत आहे. कंपनीने दिलेल्या टॅबवर कोरोना रुग्णांचे आवाज संकलित केले जाणार आहेत. एखाद्याच्या आवाजातील बदलांवरून त्याला कोरोना आहे का किंवा किती गंभीर स्वरूपाचा संसर्ग त्याला झाला आहे, हे शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न जगभरात होत आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये या प्रकारचे संशोधन सुरू आहे.

कंपनीतर्फे पालिकेच्या डॉक्टरांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार असून मंगळवारपासून प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात होणार आहे . कोरोना संसर्गामध्ये घशाला आणि फुप्फुसाला सूज येते. त्यामुळे आवाजावर आणि उच्छ्वासावर परिणाम होतो. हा परिणाम बोलण्यातून जाणवतो. आवाजाचे नमुने संगणकाला देऊन त्याद्वारे निष्कर्ष काढण्याचे हे तंत्रज्ञान विकसित केले जाणार असल्याची माहिती डॉ. आंड्राडे यांनी दिली. सुरुवातीला 500 रुग्णांचे आवाजाचे नमुने आणि वैद्यकीय अहवाल संगणकात नोंद केले जातील. त्यानुसार रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे हे पाहिले जाईल. नंतरच्या दीड हजार रुग्णांमध्ये केवळ आवाजाचे नमुने देऊन संगणकाच्या माध्यमातून निष्कर्ष काढला जाईल, असे डॉ. आंड्राडे यांनी सांगितले.