Coronavirus Vaccine : काय सांगता ! होय, तंबाखूच्या पानांपासून ‘कोरोना’विरूध्दची लस, थायलंडच्या डॉक्टरांचं संशोधन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाचा प्रादुर्भावावर काही देशांकडून कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला जात आहे. आता थायलंडच्या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांचा वापर करून कोविड 19 वरील लस विकसित केल्याचा दावा केला आहे. थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजारावर विख्यात असणार्‍या डॉक्टरांनी्र प्राथमिक चाचणी यशस्वी झाली असल्याचे नमूद केले आहे .

थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी, व्हायरसच्या डीएनएचे तंबाखूच्या पानात एकत्रिकरण करून ही नवीन लस तयार केली असल्याचे सांगितले. त्या डीएनएला झाडाकडून योग्य तो प्रतिसाद मिळतो आणि एका आठवड्यानंतर प्रथिने तयार होतात. नंतर लस तयार करण्यासाठी त्या प्रथिनांचा अर्क काढून घेण्यात येतो. आत्तापर्यंत या लसीचा वापर उंदीर आणि माकडांवर करण्यात आला आहे. मनुष्यावर चाचणी ही त्याच्या पुढची पायरी आहे. विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पानांच्या प्रथिनांपासून बनलेली ही लस अगदी औद्योगिक स्तरावरही उत्पादित करणे सोपे आणि स्वस्त आहे. तसेच याच्या पेटंटसंदर्भात कोणतीही समस्या येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.