Coronavirus : पुण्यातील गोखलेनगर, जनवाडी आणि वडारवाडीत आगामी 3 दिवस पूर्ण संचारबंदी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कंटेंमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या गोखलेनगर, जनवाडी, पांडव नगर परिसर सील करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस (बुधवार ते शुक्रवार) या परिसरात दूध व मेडिकल सुरू असतील. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांनी केले आहे.

शहरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट देखील वाढले आहेत. यानुसार गोखलेनगर, जनवाडी, पांडवनगर हा नवीन हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. दररोज रुग्ण वाढत असून, ती संख्या कमी करण्यासाठी हा परिसर सील करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात सकाळच्या वेळेत केवळ 2 तास दूध मिळणार आहे. तसेच इतर सर्व आवस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक काळजी घेत नसून त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. हा भाग बांबू आणि पत्रे लावून सील केला आहे. तसेच नागरिकांना देखील आज पोलिसांनी त्यांच्या व्हॅनमधून याबाबतची पूर्वकल्पना दिली आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस हा परिसर कडेकोट बंद असणार आहे.

दहा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट म्हणून हा भाग घोषित केला आहे. दिवसेंदिवस येथे रुग्ण संख्या वाढत चालली आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 300 हुन अधिक अक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. त्यात वडारवाडी 130, जनवाडी 75, पांडवनगर 66, गोखलेनगर 41, रामोशिवाडी 21 रुग्ण आहेत. यात काही रुग्ण बरे होत असले तरी दररोज रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.