राजधानी दिल्लीत भटकत राहिला कोरोनाचा रूग्ण, हॉस्पीटल्सनीं करून नाही घेतलं भरती, अखेर मृत्यूनं गाठलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटात सतत वाढत चाललेली रूग्णसंख्या चिंताजनक असतानाच दिल्ली सरकारने उपलब्ध बेडबाबत केलेला दावा सुद्धा फोल ठरल्याचे दिसून आले आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी एका रूग्णाला घेऊन भटकरणारे नातेवाईक त्याला वाचवू शकले नसल्याचा एक प्रकार नुकताच घडला आहे. असे अनेक प्रकार रोज घडत असल्याचा आरोप होत आहे.

राजधानी दिल्लीत रूग्णांची वाढती संख्या आणि कमी बेडमुळे होम क्वारंटाइन होणेच योग्य आहे, यास सरकारसुद्धा दुजोरा देत आहे, परंतु काही प्रकरणे अशीही असतात ज्यामध्ये रूग्णालयात भरती करणे आवश्यक असते.

हेल्पलाईनकडून नाही मिळाले उत्तर
मागील काही दिवसांपासून अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये दिल्लीत कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रिझर्व्ह बेड उपलब्ध न झाल्याने अनेक लोकांना आपला जीवन गमवावा लागला आहे. नुकतेच, दिल्लीच्या ग्रेटर कैलासच्या एका 67 वर्षीय कोरोना रूग्णाला दिल्लीच्या हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे आपला जीव गमवावा लागला.

मंगळवारी त्यांची मुलगी अमरप्रीत, जी गुरुग्राममध्ये राहते, तिने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विट करून आपल्या कोरोना पॉझिटिव्ह वडिलांसाठी मदत मागितली, परंतु, हेल्पलाईनकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

हॉस्पिटल्सचा बेजबाबदारपणा
त्यांचे जावई मनदीप यांनी सांगितले की, माझ्या सासर्‍यांना 26 मे रोजी 100 डिग्रीच्या जवळपास ताप होता आणि 29 तारीखेला आम्ही एका डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेतला, ज्यामध्ये त्यांनी 3 दिवसांचे औषध दिले. 31 तारीखेला आम्ही गंगा राम हॉस्पिटलमध्ये गेलो आणि एक्स-रे काढल्यानंतर त्यांनी म्हटले की छातीत संसर्ग आहे.

मनदीपच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कोविड टेस्टिंगसाठी ब्लड सॅम्पलसुद्धा घेतले आणि म्हटले की, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये येऊ नका.

हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप करताना मनदीप यांनी म्हटले की, आम्ही या प्रक्रियेसाठी आणखी 3 तास वाट पाहिली आणि त्यादिवशी पाऊसही जोरदार सुरू होता. रूग्णासह आम्ही सर्वजण खुप भिजलो होतो, कारण वेटींग एरियामध्ये थांबू शकत नव्हतो, तेथे स्वच्छतेचा अभाव होता.

1 जूनरोजी रिपोर्ट आल्यानंतर मनदीप आणि त्यांच्या कुटुंबाने मॅक्स, अपोलो, एम्स, सफदरजंगसह अनेक ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण भरती करण्यासाठी शोध घेतला परंतु, कुठेही जागा मिळाली नाही.

यादरम्यान, एका डॉक्टरच्या रेफरलवरच रूग्णाला ते औषध देत होते, कारण कोणतेही हॉस्पिटल रूग्णाला तपासण्यासाठी आणि प्रिस्क्रीप्शन देण्यास तयार नव्हते.

दाखल करून घेण्यास नकार
दरम्यान, पीडित कुटुंबाने महामारीतील अत्यावश्यक सुविधा म्हणून असलेले अनेक हेल्पलाईन नंबर डायल केले परतु काहीही उपयोग झाला नाही. हे नंबर सतत व्यस्त येत होते.

3 जूनला जेव्हा या ज्येष्ठ रूग्णाचा ताप वाढून 102 डिग्रीपर्यंत पोहचला तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि प्रोफेशनल प्रिस्क्रीप्शनद्वारे आपत्कालीन लाईनमध्ये उभे राहण्याचा निर्णय घेतला. औषध दिल्याने 4 जून रोजी सकाळी त्यांचा ताप 102 डिग्रीवरून घसरून 98 डिग्रीवर आला.

सतत धडपड करून अखेर कुटुंबाच्या सदस्यांनी दिल्ली हेल्पलाईनच्या सल्ल्यानंतर एलएनजेपी हॉस्पिटलीमध्ये त्यांना भरती करण्याचा निर्णय घेतला, परंतु एलएनजेपीमधील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. रूग्ण गंगा राम हॉस्पिटलशी संबंधीत असल्याचे कारण या डॉक्टरांनी सांगितले. या दरम्यान रूग्ण कारमध्येच होता.

गुरुवारी अमरप्रीतने पुन्हा ट्विटरवर मदतीची याचना केली. त्यांनी ट्विट केले की, माझ्या वडीलांना खुप ताप आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मी एलएनजेपी बाहेर उभी आहे आणि ते आतमध्ये घेत नाहीत.

या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आणि लोक दिल्ली सरकारच्या कोरोना व्हायरसच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करू लागले.

मनदीप यांनी सांगितले की, हॉस्पिटलने दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर जसे आम्ही मागे फिरलो माझ्या सासर्‍यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध पडले. आम्ही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना खुप विनंती केली, परंतु ते सतत हेच म्हणत होते की, रूग्ण गंगा राम हॉस्पिटलचा आहे.

मनदीप यांनी म्हटले की, आम्ही डॉक्टरांचे पाय धरले, रूग्णाला तपासण्यासाठी हात जोडून दयेची भीक मागत राहिलो. यानंतर डॉक्टर 10 मिनिटांनतर परत आला आणि त्याने रूग्णाला ऑक्सिजन लावला. परंतु, 15 मिनिटांतच माझ्या सासर्‍यांचा मृत्यू झाला.

परंतु, रूग्णाच्या मृत्यूनंतर सुद्धा या कुटुंबाचे दु:ख अजून संपलेले नाही, आता त्यांना अंत्यस्कारासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची लवकरात लवकर कोविड टेस्ट करणे आवश्यक असते, परंतु अजूनही त्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले नाहीत. आजारी वडीलांसाठी ते अनेक ठिकाणी भटकले असल्याने त्यांना धोका जास्त आहे.

अमरप्रीतने हे दुःख ट्विटरवर पोस्ट केले तेव्हा दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाशी संबंधित एकाने त्यांना आश्वासन दिले की, त्यांचे सॅम्पल उद्या घेतले जातील.

या पूर्ण प्रकरणावर एलएनजेपीने एक व्यक्तव्य जारी केले आहे, यामध्ये म्हटले आहे की, रूग्णाला हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत आणले गेले होते आणि डॉक्टरांनी ते येताच त्यांना तपासण्यास सुरूवात केली. हॉस्पिटल प्रशासनाकडून कुणालाही नकार देण्यात आलेला नव्हता.

राजधानी दिल्लीतील अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण नाही. कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याने अनेक लोकांचा बळी जात आहे.