Coronavirus : धक्कादायक ! खेड – राजगुरुनगर शहरात 5 डॉक्टर, पोलीस अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून आतापर्यंत शहरात कोरोनाचे संक्रमित लोक मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. मात्र, आता कोरोना विषाणूने ग्रामीण भागात देखील शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. खेड तालुक्यात लॉकडाऊन असताना देखील दिवसाला 50 कोरोनाच रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन सुरु असतानाही रोज सरासरी 50 नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत 660 रुग्ण संख्या झाली आहे. शनिवारी (दि. 18) तालुक्यात 46 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये चाकण17, राजगुरुनगर 5 आणि आळंदीमध्ये 2 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील भोसे 6, गाडकवाडी 4, शिरोली 3, केळगाव व शेलपिंपळगाल 2, राक्षेवाडी, चांडोला, कडाचीवाडी, निमगाव, धामणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात आतापर्यंत 660 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 264 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 13 जणांचा बळी गेला आहे. त्याचप्रमाणे खेड पोलीस ठाण्यात देखील कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. पोलीस ठाण्यातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजगुरुनगर शहरामध्ये 5 डॉक्टर आणि पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.