पाकिस्तानमध्ये आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला आहे. या व्हारसचे प्रमाण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात असून आत्तापर्यंत 2500 पेक्षा अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आता पाकिस्तानमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा शेजारी असणारा देश इराणमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्यानंतर पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पाकिस्तान – इराण या दोन देशांमधील विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दक्षिण आशियात चीन आणि इरानमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. बुधवारी पाकिस्तानमध्ये दोन रुग्ण आढळून आले. हे दोन्ही रुग्ण नुकतेच इराहणहून परतले होते. यातील एकजण सिंध प्रांतातील आहे तर दुसरा राजधानी इस्लामाबाद येथील आहे. तर इतर 15 जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. बलुचिस्तान आणि सिंधमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे राज्यमंत्री सय्यद गनी यांनी 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर बलुचिस्तान प्रांतात 15 मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.