Coronavirus : मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख आणि नोकरी, गृह मंत्र्यांनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मुंबईतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. दोन्ही पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली. तसेच कोरोना संदर्भात प्रकृतीची तक्रार असलेल्या पोलिसाला किंवा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत यासाठी एक स्वतंत्र कोरोना कक्ष निर्माण करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील, तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.