Coronavirus : धक्कादायक ! पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधील 3 डॉक्टर अन् 17 नर्ससह 25 जणांना ‘कोरोना’ची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स , नर्स आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र आता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील १९ परिचारिका, तीन डॉक्टर, वॉर्डबॉय यांच्यासह तब्बल २५ हॉस्पिटल स्टाफ ला ‘कोविड १९’ ची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बोमी भोट यांनी ही माहिती दिली आहे .

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रुबी हॉल क्लीनिकमधील १ हजार जणांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल नुकताच आला असून. त्यातून २५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. आरोग्य सेवकांना होत असलेल्या संसर्गामुळं चिंतेचं वातावरण आहे.

पुण्यात कोरोना बाधितांची संख्या 800 पार

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुण्यात २० तारखेच्या दुपारी दोन पासून “कडेकोट कर्फ्यु” लागू

शहरात संचारबंदी असताना देखील वाढती संख्या पाहता पोलिसांनी सोमवारी २० तारखेच्या दुपारी दोन पासून “कडेकोट कर्फ्यु” लागू करण्यात आला आहे. शहरात अत्यावश्यक सेवाचे देखील दुकान काही तासासाठी उघडी राहणार असून, त्यात ऑनलाइन आणि घरपोच सेवा देणाऱ्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता पुणे पोलिसांनी दिलेले पासेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात आता याची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.