Coronavirus : देशात पहिल्यांदाच 24 तासात आढळले ‘कोरोना’चे 386 नवे रूग्ण, आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   आरोग्य मंत्रालयाने देशात मागच्या २४ तासात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची ३८६ नवीन प्रकरणांची नोंद केली आहे आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची माहिती देताना सांगितले की, बुधवारी ही वाढ राष्ट्रीय स्तरावर संक्रमण पसरण्याचे प्रमाण दर्शवत नाही, तर यात वाढ निजामुद्दीन मरकजच्या घटनेमुळे झाली आहे.

देशात आतापर्यंत ३८ लोकांचा मृत्यू

दिल्लीतील निजामुद्दीन भागात १ ते १५ मार्चपर्यंत झालेल्या तबलिगी जमातीच्या एका आयोजनात घेतलेल्यांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाची अनेक प्रकरणे सोमवारी आणि मंगळवारी समोर आली होती. अग्रवाल यांनी म्हटले की, तबलिगी जमात संबंधित १८०० लोकांना ९ रुग्णालयात आणि क्वारंटाइन केंद्रात पाठवले गेले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली की, २४ तासात ३८६ प्रकरणे समोर आली आहेत. यात १३४ प्रकरणे तबलिगी जमात कार्यक्रमात लोकांची आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात कोरोना संक्रमितांची एकूण १६३७ प्रकरणे झाली असून संक्रमणाने पीडित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ३८ वर पोचला आहे.

दिल्लीत १८ तर तामिळनाडूमध्ये ६५ नवीन प्रकरणे

त्यांनी सांगितले की, एकट्या दिल्लीत मागच्या २४ तासात १८ प्रकरणात कोरोनाच्या संक्रमणाची पुष्टी झाली आहे. तर तामिळनाडूमध्ये ६५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अग्रवाल यांनी संक्रमणाची प्रकरणे रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पालन सुनिश्चित करणे एकमात्र उपाय असल्याचे सांगत म्हटले की, याला रोखण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. त्यांनी सांगितले की, कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत मुख्य सचिवांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत राज्यपातळीवर संक्रमण रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किंवा लॉकडाऊनचे पालन सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

देशात १२६ लॅबमध्ये होत आहे टेस्ट

पत्रकार परिषदेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च रमन आर गंगाखेडकर यांनी सांगितले की, देशभरातील आयसीएमआरच्या प्रयोगशाळांमध्ये गेल्या २४ तासांत ४५६२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गंगाखेडकर म्हणाले की, याद्वारे देशात तपासणीची पातळी वाढून एकूण क्षमतेच्या ३८ टक्के झाली आहे. बुधवारी आयसीएमआर कार्यरत प्रयोगशाळांची संख्याही वाढवून १२६ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, आयसीएमआरने अधिकृत केलेल्या खासगी प्रयोगशाळांची संख्याही ४९ वरून ५१ झाली आहे. ते म्हणाले की, कोविड -१९ साठी देशात आतापर्यंत ४७,९५१ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी मंगळवारी आयसीएमआर नेटवर्क लॅबमध्ये ४,५६२ चाचण्या घेण्यात आल्या. अधिकाऱ्याने सांगितले की आतापर्यंत कोविड -१९ चाचण्या घेण्यास ५१ खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली असून मंगळवारी खासगी प्रयोगशाळांमध्ये ८१६ चाचण्या घेण्यात आल्या.