…अन्यथा मे महिन्याच्या अखेरपर्यंत 4 कोटी भारतीयांकडे मोबाइल राहणार नाहीत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमध्ये फोन विक्रीवर लावलेली बंदी आणि मोबाईल फोन दुरुस्त करणारी दुकाने बंद आहेत. हा निर्णय कायम राहिल्यास मे महिना संपेपर्यंत देशातील चार कोटी मोबाईल युझर्सचे मोबाईल न वापरण्यासारखे होतील अशी भिती इंडिया सेल्यूलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईएने) व्यक्त केली आहे. यासंदर्भात आयसीईएने पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच व्यापारी महासंघासोबत (सीएआयटी) केंद्रीय गृहमंत्रालय, गृह सचिव, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव (डीपीआयआयटी), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून मोबाइल सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी केली आहे.

लॉकडाउनमुळे पुरवठा साखळीला फटका बसल्याने मोबाईल दुरुस्त करण्यासाठी लागणारे सामान उपलब्ध नसणे, मोबाईल दुरुस्तीची दुकाने बंद असणे, मोबाईलची विक्री बंद असल्याने नवा फोन न घेता येणे अशा अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत असल्याचे, आयसीईएने म्हटले आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये सरकारने केवळ अत्यावश्यक गोष्टींची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. लॉकडाउन सुरु होऊन पाच आठवडे झाले आहेत. सरकारने टेलिकॉम, इंटरनेट, ब्रॉडकास्ट आणि आयटी क्षेत्राला परवानगी दिली आहे मात्र मोबाईल विक्रीला परवानगी दिलेली नाही. या सर्व क्षेत्रामधील अनेक गोष्टी या मोबाईलवर अवलंबून असूनही सरकारने मोबाईल विक्रीला परवानगी न दिल्याबद्दल आयसीईएने आश्चर्य व्यक्त केलेआहे.

मोबाईल क्षेत्रामधील सर्वात मोठा वाटा हा दुरुस्ती आणि डागडुजीसंदर्भातील आहे. भारतीय मोबाईल बाजारपेठ एवढी मोठी आहे महिन्याला एकूण मोबाईल्सपैकी 0.25 टक्के प्रकरणे ही मोबाईल बंद होण्यासंदर्भातील असतात. भारतामध्ये 85 कोटी मोबाईल युझर्स आहेत. त्यामुळे या घडीला अडीच कोटी मोबाईल युझर्सला त्यांचे फोन बिघडले असूनही काही करता येत नाही अशी स्थिती आहे. मोबाईल विक्रीवर घालण्यात आलेली बंद आणि दुरुस्तीची दुकाने बंद असणे ही दोन प्रमुख कारणे यामागे असल्याचे आयसीईएने नमूद केले आहे.