OPPO मध्ये 6 ‘कोरोना’बाधित सापडल्याने प्लांटमधील काम थांबवलं, 3000 कर्मचाऱ्यांची COVID-19 चाचणी होणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील शस्र म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही कंपन्यांनी थेट कर्मचारी कपातच सुरू केली. पण देशाच्या अर्थचक्राला धोका असल्याचे लक्षात आल्यावर व कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्यानंतर केंद्र सरकारने हळूहळू उद्योगांना कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली होती.

त्यानुसार ग्रेटर नोएडातील ओपो मोबाईल कंपनीचा कारखाना 8 मेपासून सुरू करण्यात आला. सरकारने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करून काम सुरू असतानाच आज कंपनीच्या 6 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवला पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कंपनीने तातडीने कंपनीतील सर्व कामं थांबवली आहेत. तसेच कामावर असलेल्या 3000हून अधिक कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली आहे.

आमचे सगळे कर्मचारी, नागरिक यांची सुरक्षितता याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो त्यामुळे आम्ही तातडीने या कारखान्यातील सर्व कामे थांबवली आहेत. कोविड चाचण्यांच्या अहवालांची आम्ही वाट पाहत आहोत ते आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती ओपो कंपनीच्या प्रशासनाने दिली आहे.