Coronavirus : अभिनेता सोनू सूदनं COVID-19 सोबत लढणाऱ्या डॉक्टरांसाठी ऑफर केलं त्याचं 6 मजली हॉटेल !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेता सोनू सूद कोरोना महामारीच्या काळात मदतीसाठी पुढं आला आहे. त्यानं डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल स्टाफसाठी आपलं मुंबईतील हॉटेल ऑफर केलं आहे. सोनूचं 6 मजली पॉश हॉटेल जुहूमध्ये आहे. सोनूनं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, “मी आपल्या डॉक्टर, नर्स आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी काही करू शकलो तर ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही लोकं दिवस रात्र काम करत आहेत. हे लोक मुंबईच्या विविध भागातून येतात. त्यांना आराम करण्यासाठी एक चांगली जागा हवी असते. आम्ही म्युनिसिपल आणि खासगी रुग्णालयांना संपर्क करत या फॅसिलिटीबद्दल सांगितलं आहे.” असंही सोनू म्हणाला.

याआधीही बॉलिवूड स्टार शाहरुख खाननंही आपलं 4 मजली ऑफिस क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी बीएमसीला ऑफर दिली होती. बीएमसीनं ट्विट करत शाहरुख खानचे आभारही मानले होते. या आयसोलेशन सुविधेत महिला, मुलं आणि वृद्धांना ठेवलं जाणार असल्याची माहितीही ट्विटरवरून देण्यात आली होती.

कोरोना व्हायरसविरोधात देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सामान्यांपासून तर खास असे सारेच लोक आपापली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. या युद्धात डॉक्टर्स मेडिकल स्टाफ, नर्स हे महत्त्वाची भूमिका निभवताना दिसत आहेत.