Lockdown Impact : शेतकर्‍यानं 3 एकरातील झेंडू काढून दिला फेकून

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 20 दिवसांपासून सर्वच व्यवहार ठप्प असल्याचा फटका उद्योग , व्यवसाय आणि शेतीलाही बसला आहे. फुल विक्रीसाठी बाजारपेठच खुली नसल्याने माळापुरी ( ता.बीड ) येथील एका शेतकर्‍याने चार लाखांचे उत्पन्न असलेले तीन एकरातील झेंडू उपटून फेकला आहे. शेतकरी शौकतअली देशमुख असे शेतकर्‍याचे नाव आहे.

देशमुख दरवर्षी ते फुल झाडांच्या लागवडीसह इतरही पिकांचे उत्पादन घेतात. तीन एकर क्षेत्रावर साधारण दोन महिन्यांपूर्वी त्यांनी झेंडूच्या झाडांची लागवड केली होती. वेळोवेळी त्यावर औषध फवारणी , खुरपणी करून मोठ्या मेहनतीने त्यांनी झेंडूचे पीक घेतले होते. 25 दिवसांपूर्वी फुलांची एक खेप बाजारपेठेत पाठवली. मात्र सध्या फुले काढणीला आली तरी टाळेबंदीमुळे बाजारपेठेत पाठवणे शक्य झाले नाही.

टाळेबंदी मागे घेतली जाईल आणि कमीत कमी जिल्ह्यातील बाजारपेठ तरी खुली होईल या आशेने आजपर्यंत झाडे जगविली होती.अक्षयतृतीया पर्यंत सर्व काही ठीक झाले तर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आता टाळेबंदी पुन्हा वाढणार असल्याने झाडांना ठेवून तरी काय करायचे हा प्रश्न सतावू लागल्याने देशमुख यांनी झेंडूची झाडे उपटून फेकली. कधी दुष्काळ तर कधी गारपीटीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याची टाळेबंदीनेही आर्थिक कोंडी केली आहे.