Coronavirus : मोठी दिलासादायक बातमी ! राज्यात आता वाढणार नाही कोरोना रुग्णसंख्या; कारण सांगितलं तज्ज्ञांनी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत आहे. पण आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा वेग स्थिरावला होता. त्यामुळे साथीने उच्चांक गाठला असावा. आता येत्या काही दिवसांत ही रुग्णवाढ स्थिरावून नंतर कमी होईल, असे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीने उच्चांक गाठल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमधील आकडेवारीवरून हे चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. पुणे, मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या शहरांमधील आकडेवारीची वाटचाल ही वाढीच्या दिशेने होत आहे’. याशिवाय ‘देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चौपट वाढली आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दुपटीने वाढली. ही बाब महाराष्ट्रात कोरोनाचा पिक आला असल्याचे द्योतक आहे’, असल्याचे अग्रवाल म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, छत्तीसगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही अपेक्षित रुग्णवाढ दिसून आली आहे. ही वाढ अशीच होत राहिली तर पुढील आठवड्यातही या राज्यांमध्ये कोरोनाचा उच्चांक गाठला जाऊन नंतर रुग्णसंख्या कमी होईल. देशामध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा उच्चांक 25 एप्रिलपर्यंत गाठला जाईल. त्यानंतर ही रुग्णसंख्या कमी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.