Coronavirus : 40 % मुंबईकर स्वबळावर ‘कोरोना’मुक्त, मग तुम्ही काय करून दाखवलं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुंबईतील 40 टक्के जनता स्वबळावर कोरोनावर मात करून बरे झाली असेल तर, तुमच्या राज्य सरकारने काय करून दाखवलं आहे? असा थेट प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी ‘महाविकास आघाडी’ सरकारवर केला आहे.

मुंबई शहरात करण्यात आलेले सर्व्हेक्षण आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष यावरून भाजपने थेट राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आहे. केलेल्या सर्व्हेक्षणातून असे समोर आले आहे की, मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे. यावरून भाजपने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या लाखांच्या पुढे गेलीय. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि महापालिकेने तीन प्रभागांमध्ये अँटीबॉडी टेस्ट केल्या आहेत. त्यानुसार, झोपडपट्टीतील 57 टक्के तर, इमारतींतील 16 टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.तर, एका खासगी लॅबच्या पाहणीनुसार, आतापर्यंत 25 टक्के मुंबईकरांनी स्वबळावर कोरोना विषाणूवर मात करून बरे झालेत.

मुंबईत 1 लाख अँटीबॉडी चाचणी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलीय. ’झोपडपट्टीमध्ये शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती, तेव्हा वाढवली गेली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय काय..? यात तुम्ही (राज्य सरकार) काय करुन दाखवले? 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा, सत्य समोर येईल,’ असे आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.