Coronavirus : चिंताजनक ! राज्यात वयोवृध्दांपेक्षा ‘या’ वयोगटात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतामध्ये कोरोना संसर्गाने गुणाकाराला सुरुवात केली असून, ७०० हुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तर कोरोनामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी देश लॉक डाऊन केला आहे. तर देशभरात १४ एप्रिल पर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार आहे.

केरळ नंतर महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.राज्यात १३५ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.साधारणपणे हा आजार वयोवृद्ध आणि बालकांना होत असल्याचं दिसून येते. मात्र महाराष्ट्रामध्ये युवा वर्ग या कोरोनाच्या विळख्यात सापडलेला दिसतोय,कारण कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये ३१ ते ५० वयोगटातील रुग्ण अधिक असून, ३१ ते ४० वयोगटातील लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांवर मेडिकल एज्युकेशन अँड ड्रुग्स विभागाने १२२ रुग्णांचा अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला आहे.यामध्ये ३३ रुग्णांचे वय ३१ ते ४० वयोगटातील आहे.तर २१-३० आणि ४१-५० वयोगटातील संख्या प्रत्येकी २४ इतकी आहे. तर ५० ते ८० वयोगटातील संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील संख्या १० आहे.

राज्यामध्ये आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के लोकांनी परदेश दौरा केला होता.राज्यात ६९ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे.सद्य स्थितीमध्ये देशात ७४० पॉझिटिव्ह रुग्ण असून, ६६ जणांवर उपचार करून सोडून देण्यात आलं आहे. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आताची आकडेवारी पाहता कम्युनिटी ट्रान्समिशन अद्याप झालं नाही. मात्र सरकारने जास्तीत जास्त तपासणी करण्यावरती भर दिला आहे. मुंबई महापालिकेने हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. ज्यामध्ये कॉल करून तपासणीसाठी सांगू शकता.खासगी लॅबमध्येही टेस्टिंग सुविधा सुरु केल्या आहे मात्र त्यासाठी लोकांना ४ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहे.