राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाले – ‘यंत्रणा कोलमडली आहे, आता जन की बात करा’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. यंत्रणा कोलमडली आहे. आता जन की बात करा, असे गांधी यांनी म्हटले आहे.

याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. देशातील यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. कोरोनाच्या या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान राहुल गांधी यांना अलिकडेच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून ते गृह विलगीकरणात आहेत. राहुल गांधी सातत्याने देशातील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारला लक्ष्य करतात. केंद्राच्या अपयशामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप गांधीनी यापूर्वी केला. स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी मजबूर झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणे आवश्यक आहे. मात्र, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी असल्याचा घणाघात गांधी यांनी केला होता.