राहुल गांधीचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘तुम्ही आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती’

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, लस आदीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. परदेशातून मिळणाऱ्या मदतीवरून केंद्र सरकारने सतत स्वतःची छाती बडवणे हे निराशाजनक आहे. जर मोदी सरकारने आपले काम केले असते तर ही परिस्थितीच उद्भवली नसती, अशी टीका गांधी यांनी ट्विटरवरून केली आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारची धोरणे, देशातील कोरोना परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी यापूर्वी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींकडे परदेशातून आलेल्या विविध मदतीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. यातच आता गांधीनी केद्रावर योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले होते. ट्विटमध्ये त्यांची तुलना करणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवले होते.