केवळ ‘गळा’ आणि ‘नाक’चं नव्हे तर कानामध्ये देखील पोहचू शकतो ‘कोरोना’ व्हायरस, संशोधनात खुलासा

पोलिसनामा ऑनलाइन : चीनमधून पसरलेला कोरोना जगभरात चांगलाच फैलावत आहे. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 56 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून 6 लाख 36 हजार लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत.  आता या व्हायरसबद्दल नवनवीन संशोधन समोर येत आहे. कोरोना व्हायरसचं नाक, कान आणि फुफ्फुस यांच्यावर इन्फेक्शन होत होतं हे आपल्याला माहीत आहेच. पण नवीन संशोधनात कानातूनही कोरोना व्हायरसची लागण होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

मेडिकल जर्नल JAMA otolaryngology च्या रिपोर्टनुसार,  तीन अशा रुग्णांचा अभ्यास केला आहे ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या तीन रुग्णांमध्ये दोघेजण वयस्कर होते, एकाचं वय 60 आणि दुसऱ्याचं वय 80 असं होतं. या दोन्ही रुग्णांच्या कानामागील हाडाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जॉन हॉपकिंस स्कूल ऑफ मेडिसिन टीमच्या म्हणण्यानुसार, इथून पुढे या अभ्यासानुसार कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे  ‘कान’ही तपासले पाहिजेत.

संशोधनानुसार, 80 वर्षाच्या रुग्णाच्या डाव्या कानात हा व्हायरस मिळाला आहे. तसेच 60 वर्षीय रुग्णाच्या दोन्ही कानात हा व्हायरस दिसून आला आहे. या रुग्णांच्या श्रावणयंत्रणेवर देखील या व्हायरसचा परिणाम झाला होता. त्यांना ऐकूही कमी येत होतं. त्यामुळे आता सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस जगभरात वाढत असलेला कोरोनाचा रुग्णांचा आकडा आणि हे येणारे नवीन संशोधन खूप भीती निर्माण करणारं ठरत आहे.