Coronavirus : सुहागरात्रीच्या दुसर्‍याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू, लग्न समारंभात उपस्थित असलेले 15 जण आढळले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

बिहार : वृत्तसंस्था –  बिहारमध्ये कोरोना महामारीचा कहर सतत वाढत आहे. राज्यात या विषाणूमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या ७८०० च्या जवळपास आहे. राजधानी पटनामध्येही या व्हायरसचा परिणाम झाला आहे. ताजी घटना पटनामधील पालीगंज भागाशी संबंधित आहे, जिथे कोरोनाचे १५ पॉजिटीव्ह आढळले आहेत. पालीगंजमध्ये एकाच वेळी १५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खास गोष्ट म्हणजे हे सर्व १५ जून रोजी पालीगंजच्या डीहपाली गावात लग्न समारंभात मेजवानीत गेले होते.

ज्या लग्नामुळे सगळे कोरोनाग्रस्त झाले आहेत, त्या लग्नातील नवरदेवाचा लग्नाच्या दोन दिवसानंतर हनीमूनच्या दुसर्‍या दिवशीच १७ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गावकरी देखील त्याच्या मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे सांगत आहेत, मात्र याबाबत अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही. नवरदेवाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांचेही नमुने अद्याप तपासणीसाठी घेण्यात आलेले नाहीत. या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आणि त्या लग्नाशी संबंधित ज्या भागातील लोक सामील होते, त्या सर्व सुमारे १२५ लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तसेच जिथून नमुने घेण्यात आले होते तेथील सर्व भाग सील करण्यात आले होते. सध्या जिल्हा प्रशासनाने सर्व पॉजिटीव्ह रूग्णांना उपचारासाठी मसौढी येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डीहपाली गावात राहणाऱ्या एका युवकाचा १५ जून रोजी विवाह झाला होता. हा तरुण नुकताच दिल्लीहून आला असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा तो घरी आला, त्यावेळी बिहारमधील क्वारंटाइन केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर त्याला होम क्वारंटाइन केले गेले होते. १७ जून रोजी लग्नाच्या दुसर्‍या दिवशी पोटात दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्याला एका खाजगी क्लिनिकमध्ये दाखल केले गेले, त्यानंतर त्याला पटना येथे पाठवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नंतर गटविकास अधिकारी चिरंजीवी पांडेय यांच्या सूचनेनुसार, आरोग्य विभागाच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला आणि मृत युवकाच्या नातेवाईकांसह कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी सुमारे १२५ लोकांचे नमुने घेतले. प्रयोगशाळेत नमुना तपासणीनंतर १५ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालीगंज बाजारातील भाजी विक्रेत्याचाही नमुना घेण्यात आला, परंतु सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आहे. पालीगंज बाजारात एकाच वेळी इतक्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागात भीतीचे वातावरण आहे. बीडीओ चिरंजीवी पांडेय यांनी सांगितले की, संक्रमित आढळलेल्या गाव व परिसराला सीलबंद केले गेले आहे.