Devendra Fadnavis : ‘संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी’

मुंबई, ता. १९ : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर या २४ तासांत कोरोनामुळे ५०३ जणांचा मृत्यू झाला होता. एका बाजूला राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यात कोरोना सर्वसामान्य जनता त्रस्त असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी “मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते”, असे विधान केले होते.

दरम्यान, रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष तीव्र झाला असताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं गायकवाड म्हणाले होते.

संजय गायकवाड यांना आता देवेंद्र फडणवीस यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड यांच्या टीकेचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ”संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लव्हज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.