… तर कोरोनाग्रस्त रूग्णांना स्थानबध्द करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी गर्दी होत असते अशी सर्व ठिकाणं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांनी विलगीकरणास सहकार्य केलं नाही तर अशा रुग्णांना स्थानबद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आल्याने राज्य सरकारकडून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्यती खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

करोना रुग्णावर पोलिसांचा पहारा
नागपूर रुग्णालयातून संशयित रुग्ण पळून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर आता त्या दृष्टीने खबरदारी घेण्यात येणार आहे. कोरनाग्रस्त रुग्ण किंवा संशयित रुग्ण पळून जाऊ नये यासाठी पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेल्या सात देशातून परतणाऱ्यांवर सरकारकडून विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक
कोरोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण कमी असलं तरी संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय या ठिकाणी भेटी देऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुविधांची पाहणी केली.