चिंताजनक ! कोरोना संसर्गात देशातील TOP 10 जिल्ह्यात महाराष्ट्रातील ‘हे’ 8 जिल्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. देशात प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी देशात प्रामुख्याने 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, नागपूर, नांदेड, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय सरासरीचा आठवड्याचा बाधित रुग्णदर हा 5.65 टक्के आहे. यामध्ये महाराष्ट्राची आठवड्याची सरासरी 23 टक्के, तामिळनाडू 2.50 टक्के, कर्नाटकचा 2.45 टक्के, पंजाब 8.82 टक्के, छत्तीसगड 8 टक्के, मध्य प्रदेशचा 7.82 टक्के, गुजरातचा 2.2 टक्के आणि दिल्लीचा 2.04 टक्के इतका आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

संस्थात्मक क्वारंटाईन आवश्यक

काही राज्यांमध्ये आयसोलेशन होत नाही. नागरिकांना घरीच वेगळे राहण्यास सांगितले जात आहे. पण यासाठी जी देखरेख ठेवावी लागते, ती खरंच होतेय का? जर हे शक्य होत नसेल तर त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.