चव्हाणसाहेब, ‘5 महिने काहीही तयारी न करणार्‍या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस, बेडचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. असे असताना कोरोना संकटात अनेक गोष्टीवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून 5 महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला, असा हल्लाबोल उपाध्ये यांनी केला आहे.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण
देशात सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते. ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चांगली स्थिती असल्याचे म्हटले होते. तसेच केंद्र 1 लाख टन ऑक्सिजनची आयात करत असल्याचे आरोग्य सचिवांनी म्हटल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर निवेदन प्रसिध्द करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.