भारत बायोटेकला मोठं यश, Covaxin चं माकडांवर यशस्वी परीक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत बायोटेक या कंपनीची पहिल्या टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे Covaxin ची माकडांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने यासंदर्भात घोषणा केली आहे. ही लस लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये माकडांवर केलेल्या प्रयोगात सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार माकडांवर केलेल्या लसीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली आहे.

भारत बायोटेकने ही चाचणी मकाका मुलाटा जातीच्या विशिष्ट प्रकारच्या माकडांवर केली आहे. पहिली चाचणी यशस्वी पार पडल्यानंतर दुसऱ्या चाचणीसाठी भारत बायोटेक कंपनीने DCGI कडे परवानगी मागितली आहे. येत्या काही दिवसांत चाचणीचा दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनीनं 12 शहरांमध्ये कोरोना लसीची चाचणी केली आहे. त्यामध्ये ३७५ लोकांनी सहभाग घेतला होता. भारतात आतापर्यंत तीन लसींवर सध्या काम सुरू आहे.

सीरम इंन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांच्या भागीदारीतून तयार करण्यात येणाऱ्या लसीची मानवी चाचणी देखील भारतात सुरू आहे.भारत बायोटेक कंपनीने DCGI ला मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी देण्यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. DGCI च्या डॉक्टर एस. एश्वर्या रेड्डी यांनी ३८० लोकांवर ही चाचणी करण्यासंदर्भात योजना सुचवली आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्पा कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.