Coronavirus : पुणे पोलिसांचं मोठं पाऊल ! ‘या’ परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 3 दिवस बंद, फक्त दूध मिळणार (व्हिडीओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हॉटस्पॉट भागात आणखी अतिरिक्त निर्बंध लागू केले असून, उद्यापासून पुढील 3 दिवस फक्त दूध मिळणार आहे. भाजीपाला, किराणा व इतर अत्यावश्यक वस्तू विक्रीला मनाई करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.

शहरात कर्फ्यु लागू असताना देखील नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरत आहेत. कारवाई केल्यानंतर देखील या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. पहिल्यापासून हॉटस्पॉट ठरलेल्या भागातच हे कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कडक उपाययोजना करून देखील त्यात काही फरक पडलेला नाही. भाजीपाला, किराणा आणि मेडिकलची दुकाने या भागात उघडी असायची. त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असत. त्यामुळे देखील रुग्ण संख्या वाढत असावी असा संशय आहे.

त्यामुळेच आता या परिसरात प्रशासनाकडून कडक पावले उचली जात असून, पुणे पोलिसांनी पुढील 3 दिवस (1 ते 3 मे) अतिरिक्त निर्बन्ध लागू केले आहेत. या काळात भाजीपाला, किराणा याची विक्री देखील बंद असणार आहे. फक्त दूध मिळणार असून, त्यासाठी देखील सकाळी 10 ते दुपारी 12 ही दोन तासांची वेळ देण्यात आली आहे. तर घरपोच सेवा देणाऱ्यांसाठी सकाळी 6 ते सकाळी 10 अशी वेळ ठेवण्यात आली आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

 

या भागात अतिरिक्त निर्बंध

1) समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याचा सर्व परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.

2) स्वारगेट पोलिस ठाण्याचा गुलटेकडी , महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर व खड्डा झोपडपट्टी हे भाग असतील.

3) लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद जवळचा परिसर, भिमपूरा लेन, बाबाजान दर्गा आणि क्वार्टर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला रोड आणि शितलादेवी मंदिर रोड

4) बंडगार्डन परिसरात ताडीवाला रोड या भागात हे निर्बंध असतील

5) सहकारनगर पोलीस ठाणे– तळजाई वसाहत आणि बालाजी नगर या भागात हे निर्बंध असणार आहेत.

6) दत्तवाडी भागात पर्वती दर्शन परिसर…

7) येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात लक्ष्मीनगर, गाडीतळ आणि चित्रा चौक परिसर

8) खडकी पोलीस ठाण्याच्या परिसरात पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर आणि इराणी वस्ती पाटकर प्लॉट या भागात हे निर्बंध असणार आहेत.

हे बंद आणि हे सुरू…

पुढील तीन दिवस या भागात किराणा, भाजीपाला, अंडी, मटण, फळे, पूर्ण पणे विक्री बंद असणार आहे.

तसेच या भागात दूध विक्री केंद्र फक्त दिवसभरात दोन तासासाठी म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत खुली असणार आहेत. तर घरपोच दूध देणाऱ्यांना सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत सेवा देता येणार आहे. त्यासोबतच दुधाच्या वाहतुकीस निर्बंध नसतील. शासकीय अन्नधान्य वितरण कार्यालय यांच्याकडून सुरू असलेल्या कार्यवाहिसाठी हे निर्बंध लागू होणार नाहीत.