राज्यांत अडकलेल्या लोकांना ‘रेल्वे’ने नव्हे तर ‘बस’नेच दुसऱ्या राज्यात पाठवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन काळात राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने काही गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. यानंतर काही राज्यांनी केंद्राकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्रालयाने गुरुवारी (दि.30) कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नागरिकांना सध्या केवळ बसनेच त्यांच्या गावी पाठवले जाईल, असे स्पष्ट केले.

यासंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यासाठी रेल्वे चालविण्याची मागणी केली होती. तसेच तेलंगणाचे मंत्री तालासानी श्रीनिवास यांनी देखील देशात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे चालवण्याची मागणी केली होती. त्यांनी गुरुवारी बोलताना म्हटले होते की, लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत जवळपास दोन कोटी लोक अडकलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स अयोग्य आहेत. लोक एवढ्या गरमीमध्ये 3 ते 4 दिवस एका बसमध्ये कसे प्रवास करू शकतात, बस पेक्षा रेल्वे हा अधिक चांगला पर्याय आहे.

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते की, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना नेण्यासाठी आणि आणण्यासाठी सशर्त परवानगी दिली जात आहे. यासाठी राज्यांनी बसेसची व्यवस्था करावी. या बसेसना पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्यात यावे.