व्यावसायिकांचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘कसले ब्रेक द चेन, इथे गळ्यातील चेन मोडायची वेळ आली?’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांना व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांनी विरोध केला आहे. नवी मुंबईतील छोटे व्यावसायिक संतप्त झाले असून, कसले ब्रेक द चेन इथे गळ्यातील चेन मोडायची वेळ आल्याची भावना व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या लढाईत आम्ही शासनाच्या सोबत आहोत, परंतु दुकाने बंद ठेवणे यासाठी पर्याय नसल्याचे सांगत दिवसातून काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत.

नवी मुंबईत दररोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयाविरोधात लहान व्यावसायिकांसह, व्यापा-यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक महिने व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्या लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर 2 महिने व्यवसाय सुरू होते. आता पुन्हा कोरोना वाढल्याने व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न लहान व्यावसायिक आणि सामान्य नोकरदार वर्गाला पडला आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने अडचणी येत आहेत. बँकांचे हफ्ते थकले आहेत. मुलांची शैक्षणिक फी भरलेली नाही. उदरर्निवाह करणे जिकिरीचे झाले असून कर्ज वाढले आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याच्या निर्णयात शासनाने शिथिलता दयावी, अशी प्रतिक्रिया भावना पटेल यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरात दोनच महिने दुकान सुरू होते; परंतु भाडे पूर्ण वर्षभराचे भरावे लागणार आहे. जानेवारी महिन्यापासून व्यवसाय सुरू झाल्याने सर्व हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अशा निर्माण झाली होती. परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा तोच प्रसंग आल्यावर आता काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाल्याचे प्राजक्ता दिवेकर यांनी म्हटले आहे.