Coronavirus : दिलासादायक ! ‘कोरोना’ हरणार अन् देश जिंकणार, ‘ही’ 3 औषधं टक्कर देणार ‘व्हायरस’ला

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत कोरोना संसर्गित रुग्णांच्या क्रमवारीत जगात चौथ्या स्थानी पोहचला आहे. देशात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १४८२१ नवे संसर्गित रुग्ण आढळले. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्य्या ४ लाख २५ हजार २८२ झाली आहे. अद्यापर्यंत कोरोना संसर्गावर कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पण याच दरम्यान अनेक दिलासादायक बाबी समोर येत आहेत.

देशातील औषध बनवणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांचे तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (REMDECIVIR) आणि फेवीपिरवीर (FAVIPIRAVIR) औषधांची निर्मिती करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी याची क्लिनिकल चाचणी सुरु झाली असून, रुग्णांवरती ते प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे. अँटीवायरल ड्रग फेवीपिरवीर मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (GLENMARK PHARMACEUTICALS) तयार केले असून, हे इन्फ्लूएन्झाच्या उपचारांसाठी जपानमध्ये यापूर्वीच वापरण्यात येत होते. कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरु आहेत. ग्लेनमार्कने सांगितल्यानुसार, कोरोना संसर्गित रुग्णांच्या उपचारात ८८ टक्के रुग्णांना या औषधाचा फायदा झाला असून, चार दिवसातच या व्हायरसचा, लोड म्हणजेच शरीरातील विषाणूंची संख्या कमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ADV

या औषधा संदर्भात ग्लेनमार्क ने २० जून रोजी पत्रकार परिषद घेत चार क्लिनिकल चाचण्यांची माहिती दिली. त्यातील २ चाचण्या चीनमध्ये, एक रशियात आणि एक जपानमधील आहे. चीनमधील एका अभ्यासात ८० रुग्ण घेण्यात आले, त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. LOPINAVIR सारखी इतर औषधे देखील एका ग्रुपला देण्यात आली. तुलनात्मक अभ्यासात, हे स्पष्ट झालं की ज्या रुग्णांना फॅबिफ्लू देण्यात येत होते त्यांच्यात व्हायरल लोड कमी झाला. यामुळे रुग्ण लवकर बरे झाले. चीनच्या दुसऱ्या अभ्यासात २३६ रुग्णांचा सहभाग नोंदविण्यात आला. त्यामध्ये औषधाने चांगला परिणाम दाखवला. या औषधास फॅबिफ्लू (FABIFLU) असं ब्रँड नाव देण्यात आलं. जे टॅबलेट स्वरुपात देण्यात येणार आहे. फॅबिफ्लू फक्त कोरोना संसर्गाची सौम्य आणि सरासरी लक्षणे असलेल्या रुग्णांवरतीच वापरलं जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच आणखी एक औषध कंपनी कोरोना संसर्गाचे संक्रमण रोखण्यासाठी कोविफोर हे दुसरं औषध लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. हे रेमडेसिवीरचं जेनेरिक व्हर्जन असणार आहे. २०१४ साली इबोलावरील उपचारसाठी हे औषध वापरण्यात आलं होत. कोविफोर हे औषध इंट्रावेनस पद्धतीने म्हणजेच नसेद्वारे दिलं जात. या औषधासाठी जवळपास ५००० ते ६००० खर्च अपेक्षित आहे. यानुसार पाच दिवसांसाठी तीस हजार खर्च येऊ शकतो. कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईतील तिसरं औषध सिप्रमी आहे. हे सुद्धा रेमडेसिवीर प्रमाणेच आहे. सिप्ला ही कंपनी यावरती काम करत असून, अद्याप कंपनीने त्याच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती सांगितली नाही. ही औषधे कोरोना संसर्गावरती खात्रीशीर नसल्यामुळे, त्यांचा वापर विशेष मार्गने आणि काही बाबतीत केला जाणार आहे.