Coronavirus : धारावीत ‘कोरोना’चे 68 नवे रूग्ण तर एकाचा मृत्यू, आतापर्यंत 733 बाधित तर 21 जणांचा बळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असून वाढणाऱ्या रुग्णांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रात एकट्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. मुंबईतील धारावी या ठिकाणी कोरोनाने शिरकाव केल्याने अधिक चिंता वाढली आहे. धारावीतील आजच्या संख्येने मुंबईची अधिकच चिंता वाढली आहे.

धारावीमध्ये दररोज 30 ते 40 च्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आजचा आकडा दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. धारावीतील वाढती संख्या पाहून प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. मात्र, कोरनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने चिंता वाढली आहे. मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर पहिल्याच दिवशी विरोधी भूमिका घेत दुकाने बंद केली.

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि वाईन शॉप समोर होणारी गर्दी आणि त्या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे मुंबईत एकाच दिवसात दारुची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्येही कोरोनामुळे दारु विक्री बंदच ठेवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कंपन्या, कामासाठी शिथिलता दिलेली असताना आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टी भागामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे 68 रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 733 झाला आहे. तर एकूण मृत्यूंची संख्या 21 झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.