Coronavirus : धक्कादायक ! मृत्यूनंतर देखील होतात ‘हाल’, 14 मृतदेहांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल (Video)

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या जवळपास पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत चौथ्या स्थानावरती पोहचला असताना, एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे. अत्यंसंस्कार करण्यासाठी मृतदेह फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता मध्ये घडला आहे. रुग्णालयातील १४ मृतदेह महापालिकेच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

बुधवारी ही घटना गारिया स्मशानभूमीत घडली असून, कोरोना संसर्गित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी हे मृतदेह महापालिकेच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी फरफटत घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, हे अमानवी कृत्य असून लोकांच्या मनात याबाबत भीती असताना पश्चिम बंगाल सरकारवर रागही असल्याचं विजयवर्गीय म्हणाले.

एका हिंदी वृत्तपत्राला स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेची एक गाडी आली होती. त्याच्यामधील १४ मृतदेह कर्मचाऱ्यांनी फरफटत स्मशानभूमीत नेले. हे मृतदेह कोरोना संसर्गित रुग्णाचे असू शकतात अशी शंका ही त्यांनी उपस्थित केली. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी मोठ्या संख्येने या घटनेचा निषेध करून आंदोलन केलं. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक नागरिकांची समजूत काढली. मात्र, व्हिडिओची सत्यता अद्यापर्यंत तपासण्यात आली नाही.