Coronavirus : मुंंबईतील कोळीवाडा, बिबीसारनगर ’सील’ ! समुह संसर्गाचा धोका वाढल्याने ‘कारवाई’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील कोळीवाडा येथे एकाच वेळी कोरोनाचे ८ संशयित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी परदेशातून आलेल्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिल्याने तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या महिलेने सोसायटी व परिसरातील लोकांना याची माहिती दिली नाही. त्यामुळे आता गोरेगावमधील बिबीसारनगर परिसर सील करण्यात आला आहे समुह संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोळीवाडा परिसर पोलिसांनी सील केला आहे. या परिसरातून बाहेर जाणार्‍या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून सर्व दुकानेही बंद करण्यात आली. लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन करुन पालिकेने निर्जंतुकीकरणासाठी परिसरात फवारणी सुरु केली आहे.

कोळीवाड्यातील जनता कॉलनी, आदर्शनगर आणि कोळीवाडा या भागात संशयित सापडले आहेत. त्यानंतर प्रशासनाने तातडीने संपूर्ण परिसरात प्रवेशबंदी केली आहे. त्यातील एकाच घरातील चार जणांपैकी एक निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या भागातील लोकांनी अत्यावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडून नये, म्हणून दुधासह अन्य आवश्यक बाबींसाठी २ हजार स्वयंसेवकांचे गट तयार करण्यात आले आहेत. एका स्वयंसेवकाकडे १० -१० जणांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. सुरक्षित अंतर राखत आवश्यक वस्तूची यादी घेऊन ठरलेल्या वेळेत विशिष्ट ठिकाणांवरुन त्या वस्तू घेऊन संबंधित नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

बिंबीसारनगरात कोरोना संशयित
गोरेगाव येथील बिंबीसार नगरातील एका इमारतीत एक कोरोना संशयित महिला आढळून आली. ही महिला परदेशातून आली होती. तिला होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. ही बाब तिने सोसायटीतील लोकांपासून लपवून ठेवली होती. तिला त्रास होऊन लागल्याने आता तिला हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. इमारतीतील अनेकांशी तिचा संपर्क झाल्याने या इमारतीत प्रवेश बंदी करुन हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्यानंतर या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या कॉलनीत अनेक मराठी कलावंत राहतात.