Coronavirus Lockdown Again : भारतात ‘कोरोना’चा कहर, देशातील अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या २४ तासांमध्ये देशात २८ हजार ७०१ नव्या कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली आहे. अनेक उपाययोजना केल्यानंतर देखील देशातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरात आणि काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. तर पाहूया कोणत्या राज्यांनी आणि शहरांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

१. उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी उत्तरप्रदेशमध्ये लॉकडाऊन लागू राहणार आहे.

२. मदुराई (तामिळनाडू)

तामिळनाडू येथील मदुराई शहरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांनी येथील लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मदुराईमधील लॉकडाऊन १४ जुलै रोजी संपणार आहे.

३. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कोरोना संसर्गित रुग्णांची मृत्यूंची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवरती काश्मीरमधील श्रीनगरसह इतर काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

४. बंगरुळूमध्ये १४ जुलैपासून लॉकडाऊन

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगरुळूमध्ये सुरवातीला कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, अनलॉक नंतर त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्याच अनुषंगाने पुन्हा १४ ते २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू करण्यात येतील.

५. ठाण्यात १९ जुलैपर्यंत वाढवला लॉकडाऊन

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे ठाण्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासंबंधी अधिकृत आदेश सुद्धा ठाणे महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

६. कल्याण-डोंबिवली

कोरोना संसर्गाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १९ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

७. पुणे

पुण्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यापैकी १८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तर १९ जुलैपासून पुढे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल.

८. औरंगाबाद

शहरातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत आठ हजारांच्या वरती लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर तीनशे पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता शहरात १० ते १८ जुलै दरम्यान आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

९. सोलापूर

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी १६ ते २६ जुलै या कालावधीत सोलापूर शहर आणि नजीकच्या काही तालुक्यातील गावांमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.