Coronavirus Lockdown : सर्वपक्षीय बैठकीत PM नरेंद्र मोदींनी दिले ‘लॉकडाऊन’ वाढविण्याचे ‘संकेत’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसमुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता 14 एप्रिलला लॉकडाऊन संपेल असा विचार करणे मुळीच शक्य नाही. तसेच, ते मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतील पण लॉकडाऊन लवकरच संपवता येणे कठीण आहे.

पंतप्रधान मोदींनी नेत्यांना सांगितले की, कोरोना विषाणूच्या आधी आणि नंतरचे जीवन एकसारखे राहणार नाही. हे संकट संपल्यानंतर बरेच व्यावहारिक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडतील.दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्याशिवाय तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, बसपाचे सतीश चंद्र मिश्रा, द्रमुक के टी आर बालू , बीजदचे पिनाकी मिश्रा, वायएसआरचे मिथुन रेड्डी, सपाचे रामगोपाल यादव, जदयूचे राजीव रंजन सिंह, लोजपाचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक इतर पक्षांच्या नेत्यांचा सह्भाग होता. तसेच पंतप्रधानांनी ज्या पक्षाच्या नेत्यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पाचपेक्षा जास्त खासदार आहेत अश्या नेत्यांशीही संवाद साधला.

विशेष म्हणजे, 24 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर, विरोधी पक्षांशी पंतप्रधानांचा हा पहिला संवाद होता. दरम्यान, याआधी 2 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी अलिकडच्या काळात परदेशात भारतीय मिशनचे डॉक्टर, वार्ताहर, राजकारणी यांच्यासह विविध पक्षांशी संवाद साधला आहे.

नुकतीच पंतप्रधानांनी महामारी थांबविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी कॉंग्रेस नेते सोनिया गांधी, तृणमूल कॉंग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख स्टालिन आणि इतर अनेक नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवगौडा आणि मनमोहन सिंग यांच्याशीही संवाद साधला.