Coronavirus Lockdown : भारताला 21 नव्हे तर 49 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाचवू शकतो, तज्ज्ञांचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी पूर्णपणे बंद पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

असे असले तरी, भारतातील परिस्थिती सुधारण्यासाठी 21 दिवसांचा नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन असावा असे केंब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या संशोधकांनी एका संशोधनात म्हटले आहे. या संशोधनात 49 दिवस संपूर्ण राष्ट्रव्यापी लॉकडाऊन किंवा नियमितपणे दोन महिन्यांत काही दिवसांची विश्रांती त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन आवश्यक आहे. कोरोनाला भारतात पुन्हा पसरण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो
‘इज स्ट्रक्चर्ड इम्पॅक्ट ऑफ सोशल डिस्टसिंग ऑन केविड-19 एपिडिमिक इन इंडिया’ या शीर्षकाने एक अहवाल जारी करण्यात आला आहे. याच गणिताचे एक मॉडेल देण्यात आले आहे. यामध्ये भारतातील लोकसंख्येचे वय आणि सामाजिक संपर्क रचना याचा समावेश आहे. या अहवालात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भारताला 21 दिवसांचा नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊनची गरज आहे.