महापौरांनी स्वतःची ‘लायकी’ तपासावी ; सेना नगरसेवकाची भाजप पदाधिकाऱ्यावर जोरदार ‘टीका’

अहमदनगर : एखाद्या नगरसेवकाची लायकी काढणे, महापौर पदाला शोभत नाही. त्यांनी स्वत:चीच लायकी तपासावी, अशी जोरदार टीका शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर केली आहे.

अभियंता कल्याण बल्लाळ बदली प्रकरणावरून महापौर वाकळे यांनी बोराटेंची लायकी नगरकरांना माहिती आहे, अशी टीका केली होती. त्या टीकेचा बोराटे यांनी आज खरपूस समाचार घेतला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, संभाजी कदम आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना बोराटे म्हणाले की, तुमच्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेलो आहे. नगरकरांनी सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी करुन माझी लायकी दाखवून दिलीय. माझ्या विजयाचा आलेख चढता आहे. वाकळे यांनी सर्वसामान्यांच्या जमिनी लाटून संपत्ती कमविली आहे.

वाकळे यांनी राजकारणासाठी स्वत:च्या मुलाची जन्मतारीख लपविली. महापौर निवडणुकीत पैसे घेणारे पुढारीच त्यांचे बोलविते धनी आहेत. मनपात अनेक सर्वसामान्य कर्मचारी, लिपीक, सफाई कामगार आदी कर्मचार्‍यांचे बदलीसाठी शंभर अर्ज दाखल आहेत. त्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत. मात्र, वाकळे महापौर होताच बल्लाळ यांची नगररचना विभागात बदली होते. महापौरांचे चुकीचे ‘लेआऊट’ मंजूर करण्यासाठीच बल्लाळ यांची नगररचना विभागात बदली केल्याचा आरोप बोराटे यांनी केला.

सात महिन्यात कोणते ठोस काम केले, हे महापौरांनी जनतेला सांगावे. उपनेते अनिल राठोड यांनी तुमचे नव्हे तर माजी महापौर सुरेखा कदम यांच्या कामाचे कौतुक केले होते, असा टोलाही बोराटे यांनी लगावला आहे.

.. एवढे पैसे आले कुठून ?

महापौर निवडणुकीत १३-१४ कोटी रूपये खर्च झाल्याचे ‘ते’ खासगीत सांगतात. एवढे पैसे कोठून आले? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी बोराटे यांनी केली. मी नगरसेवक असताना ते एका कंपनीत हेल्पर होते. आज एवढी संपत्ती त्यांच्याकडे आली कोठून, असा सवालही बोराटे यांनी उपस्थित केला.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन