भीक मागण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण, कोंढवा पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुटका केली. तर अपहरण करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या यात्रेमध्ये ते मुलाला घेऊन लपलेले असताना पोलिसांनी मुलाची सुटका केली.

लाला शिवाजी सुर्यवंशी (३८, इंदिरा वसाहत औंध पुणे, मुळ नंदगाव ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद), व सुनीता लक्ष्मण बिनावत (३०) असे अटक केलेल्या दोघांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद पांडूरंग आडे (२६, आई माता मंदिर, कोंढवा) हे त्यांच्या पत्नीसह राहणअयास आहेत. त्यांना अविनाश आडे नावाचा साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. कोंढव्यात ते रविवारी सायंकाळी शालीमार सोसायटीजवळ होते. त्यावेळी त्यांचा मुलगा अविनाश हा खेळत होता. काही वेळाने तो अचानक गायब झाला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

त्याचे अपहरण खंडणीसाठी केले असल्याची शक्यता कमी होती. तसेच त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. त्यामुळे भीक मागण्यासाठी मुलाचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांन तातडीने हडपसर, कोंढवा, मार्केटयार्ड, शिवाजीनगर, कॅम्प, वानवडी पोलीस ठाणी, पुणे, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन या परिसरात मुलाचा शोध घेतला. तसेच शहरातील ११० सीसीटिव्ही तपासले. तेव्हा मुलाचे अपहरण करणऱ्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस सासवडपर्यंत जाऊन पोहोचले. तेव्हा दोघेही पुरंदर तालुक्यातील वीर गाव येथे गेले असल्याची माहिती समोर आली. वीर गावात श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा सुरु आहे. पोलिसांनी मध्यरात्री गावात धाव घेतली. त्यावेळी तेथे  लाखो भाविकांची गर्दी  होती. त्या गर्दीत पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. तेव्हा एका लहान मुलाला कपड्यामध्ये बांधून झोपडीच्या बाजूला झुडपात ठेवण्यात आले असल्याची माहिती सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन पाहिल्यावर संबंधित मुलगा तेथे मिळून आला. त्याची सुखरुपपणे पोलिसांनी सुटका केली. तर सुर्यवंशी वमहिला बिनावत या दोघांना ताब्यात घेतले.

तर मुलाला त्यांच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांच्या पथकाने केली.